शिर्डी (अहमदनगर) President Droupadi Murmu Shani Shingnapur Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती यांनी गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला तेलाचा अभिषेक घातला. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी शनिदेवाच्या दुपारच्या आरतीला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रपती यांनी शनिदेवाच्या मंदिरात 'संकल्प पूजा' केली. स्वतः वरील आणि देशातील जनतेवरील शनिपिडा दूर व्हावी तसेच सुखशांती लाभावी यासाठी ही संकल्प पूजा केली. राष्ट्रपतींबरोबर त्यांची मुलगी इतिश्रीही उपस्थिती होती. शनिदेवाच्या दर्शनानंतर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर आणि जनसंपर्क प्रमुख अनिल दरंदले यांनी शॉल, श्रीफळ, शनिदेवाची प्रतिमा देऊन राष्ट्रपतींचा सन्मान केला.
महाराष्ट्रीयन भोजनाचा घेतला आस्वाद : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांची मुलगी इतिश्री (Itishri Murmu) या शनिदेवाच्या दर्शनासाठी येणार असल्यानं, शनिदेव देवस्थानच्या वतीनं त्यांची भोजन व्यवस्था देखील करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रपतींनी महाराष्ट्रीयन करडाईची भाजी, चपाती, वरण-भात आणि शिरा अशा भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर राष्ट्रपती पुन्हा हेलिकॉप्टरनं पुण्याकडं रवाना झाल्या. यावेळी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais), मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हेही राष्ट्रपतींबरोबर उपस्थिती होते.