शिर्डी (अहमदनगर) -साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व परिचारकांचे संस्थानने 40 टक्के वेतन कमी केले आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आज (दि. 15 सप्टें.) साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर घंटानाद आणि रक्तदान करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयातील वैदकीय विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिका व परिचारकांना काम जास्त मात्र वेतनात चाळीस टक्के कमी, असा अन्याय केला जात आहे. समान काम समान वेतन आणि इतर मागण्या घेऊन कर्मचाऱ्यांनी साई संस्थानचा सध्या कारभार पहात असलेल्या उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चार सदसीय समीतीला अनेकदा निवेदने दिली. मात्र, न्याय मिळत नसल्याने या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आज त्यांच्या मदतीला राज्यमंत्री बच्चु कडुंची प्रहार जनशक्ती संघटना रसत्यावर उतरली होती. संघटनेच्या कार्यकर्ते व परिचारिकांनी साईबाबा मंदीराच्या चारनंबर फाटकासमोर घंटानाद आंदोलन केले आहे. तसेच साई मंदिराजवळील नगर-मनमाड रस्त्यालगत रक्कदान आंदोलनाची तयारी करण्यात आली
होती. मात्र, रस्त्यालगत आंदोलन करता येणार नसल्याचे पोलीसांनी सांगितल्यानंतर काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी दुसऱ्या जागी रक्तदान करत आपला निषेध नोंदवला.