अहमदनगर:सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक तरुण नाचताना दिसत आहे. संदल मिरवणूक काढण्यात आलेली असताना औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवत काही युवकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
चौघांवर गुन्हा दाखल -अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा केला जात होता. काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न:राज्य सरकारकडून अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.