महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदी लागू होण्याच्या भीतीने शिर्डीतील व्यावसायिक हवालदिल - शिर्डीतील कोरोना परिस्थिती

शिर्डीतील साईबाबांचे मंदिरही बंद करण्यात आल्यानंतर आठ महिने शिर्डीकरांना आर्थिक झळ सोसावी लागली. आता पुन्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागल्यानंतर साई मंदिर पुन्हा बंद होणार का? अशी भीती पसरली आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे सध्या शिर्डीत पाहायला मिळत आहे.

Possibility of re imposition of lockdown in Shirdi
शिर्डी

By

Published : Feb 25, 2021, 3:44 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगात टाळेबंदी करण्यात आली होती. शिर्डीतील साईबाबांचे मंदिरही बंद करण्यात आल्यानंतर आठ महिने शिर्डीकरांना आर्थिक झळ सोसावी लागली. आता पुन्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागल्यानंतर साई मंदिर पुन्हा बंद होणार का? अशी भीती पसरली आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे सध्या शिर्डीत पाहायला मिळत आहे.

शिर्डी

टाळेबंदी पुन्हा लागू होईल या भीतीने याचा पहिला फटका येथील हॉटेल्स आणि लॉजिंगवाल्यांना बसायला सुरुवात झाली आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांनी शिर्डीत राहण्याचे बुकींग रद्द केले आहे. त्यामुळे आता पुन्हा शिर्डीत टाळेबंदी नको, अशी भूमिका येथील व्यावसायिकांची आहे. कोरोनाचे नियम आम्ही पाळतो, हवे तर आणखी कडक नियम करा, पण रोजी-रोटीचा प्रश्न उपस्थित होऊ देऊ नका, अशी मागणी शिर्डीकर करत आहेत.

नगरपंचायतीकडून जनजागृती करत दंडही करण्यास सुरुवात

शिर्डीत दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यात मंदिर रात्री अकराला बंद होऊन पहाटे चारला सुरू होते. त्यामुळे जणू शिर्डी चोवीसतास सुरू असते. त्यात आता कोरोना रोखण्यासाठी नगर जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लावली गेल्याने दर्शनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. संचारबंदीचा भंग होऊ नये म्हणून रात्रीच्या आणि पहाटेच्या आरतीला भाविकांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने आता कोरोनाच्या नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी सुरू केल्यानंतर शिर्डी नगरपंचायतीनेही जनजागृती करत दंडही करण्यास सुरुवात केली आहे.

शिर्डीत दररोज करोडोंची उलाढाल होत असते, टाळेबंदी काळात सर्व व्यवहार पूर्णपणे थांबले होते. त्यामुळे अनेकांना चांगलाच आर्थिक झटका बसला. आता कोरोनासोबत जगताना पुन्हा आर्थिक झळ कोणालाच नको आहे. मात्र, दुसरीकडे पैशांसाठीच कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने आता टाळेबंदी हवी की, नियम पाळावेत हे शिर्डीकरांच्या हातात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details