अहमदनगर(शेवगाव) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवगावमध्ये तैनात असलेल्या पोलीस आणि होमगार्डवर भाजीविक्रेत्यांनी हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहिती देताना शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव निकले लॉकडाऊनच्या काळात भाजीविक्रेते आणि किराणा मालाच्या व्यापाऱयांनी अत्यावश्यक मालाची विक्री करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आहेत. शेवगावमध्ये मात्र भाजीपाला विकणारे आणि किराणा दुकानदारांकडून या आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत या व्यापाऱ्यांनी केली.
शेवगाव शहरामध्ये नऊ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक ते क्रांती चौकादरम्यान हॉटेल उडपी समोर काही भाजीपाला विक्रेत्यांच्या पुढे गर्दी जमली होती. शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी आणि पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी या भाजीविक्रेत्याला दुकान व टेम्पो काढून घेण्याचे समजावून सांगितले. सदर भाजीपाला विक्रेता आणि त्याच्या मुलांनी पोलीस व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
भाजीपाला विक्रेता सुभाष बन्सी घुगे, अमोल घुगे, अतुल घुगे (रा.शेवगांव) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.