अहमदनगर - अकोले विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार राजूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
सीताराम भांगरे बोलताना... याबाबत माहिती अशी की, गुरूवार (१७ सप्टेंबर) रोजी तक्रारदार रामदास लखा बांडे हे दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावातील दत्त मंदिराजवळ पायी जात असताना मागून आमदार डॉ . किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेली. त्या वेळी मला वाटले पर्यटक आहेत म्हणून गाडी हळू चालवा, असे ओरडून सांगितले. त्या गोष्टीचा राग येऊन आमदार गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले आणि म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे असे म्हणून त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले म्हणून त्याचे विरोधात कायदेशीर फिर्याद राजुर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या वेळी तक्रारदारासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. राजूर पोलिसांनी त्याची तक्रार घेतली असून अदखलपात्र गुन्हा रजि. क्रमांक १२८३/२० भादंवि ५०४. ५०६ दाखल केला आहे. या घटनेचे पडसाद उमटले असून भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.