अहमदनगर - शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित झाल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र संबंधित रुग्णालयाने ऑक्सिजन उपलब्ध होता, मात्र रुग्णाची परिस्थिती नाजूक होती त्यात हा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.
हेही वाचा -पुण्यात कडक लॉकडाऊनची गरज नाही, न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणार - महापौर
ऑक्सिजन उपलब्ध न झालेला रुग्ण पोलीस कर्मचारी-
कोरोना उपचार सुरू असलेले पोलीस कर्मचारी हे दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्रात सेवेत होते. 28 एप्रिलला त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवारी पहाटे रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजन संपत असल्याचे सांगत सिलेंडर उपलब्ध करण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांना वेळेत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही आणि दरम्यान ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध ठेवलेला नव्हता किंवा अगोदरच ऑक्सिजन उपलब्ध करून घ्या असे सांगितले नव्हते, ऐनवेळी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करा असे सांगितले असताना सिलेंडर रिफील केंद्रावर संबंधित रुग्णालयात रुग्ण संख्येनुसार मंजूर केलेले सिलेंडर रुग्णालयाने नेलेच नसल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचे नातेवाईक यांनी सांगितले आहे.