अहमदनगर - महामार्गावर सेवा बजावत असताना पोलीस हेडकोन्स्टेबल शहाजी हजारे यांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये हजारे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर- सोलापूर रोडवर मांडवगण फाटा परिसरात घडली.
कंटेनरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू, अहमदनगर- सोलापूर रोडवरील घटना - पोलीस हेडकोन्स्टेबल शहाजी हजारे यांना भरधाव कंटेनरने दिली धडक
महामार्गावर सेवा बजावत असताना पोलीस हेडकोन्स्टेबल शहाजी हजारे यांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये हजारे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस हवालदार शहाजी हजारे हे केडगाव पोलीस मदत केंद्रात नेमणुकीस आहेत. आज सकाळी ते नगर-सोलापूर रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. मांडवगण फाट्याजवळ भरधाव वेगातील वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत हजारे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक वाहन वेगात घेऊन निघून गेला होता. मात्र, शिर्डीजवळ चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू होताच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळापासून तब्बल नव्वद किलोमीटर अंतरावर शिर्डीजवळ ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार हजारे हे नगर तालुक्यातील चिंचोली पाटील येथील रहिवासी आहेत. कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाल्याने चिंचोली पाटील परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.