अहमदनगर- शिर्डीतील हॉटेल साईसीमामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या शिर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या दरोडेखोरांकडून गावठी कट्ट्यासह एक चाकू, एक दुचाकी असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हे सर्व दरोडेखोर पॅरोलवर सुटलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिर्डीत दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या शिर्डीमध्ये हॉटेल साई सीमा येथे आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व प्रवीण दातरे, उपनिरीक्षक वैभव रुपवते, पोलीस हवालदार काकड, नाईक सातपुते, मकासरे, पळसे, अजय अंधारे, राठोड, पटेल आदीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी पथकाने हॉटेल साईसीमा येथील तिसऱ्या मजल्यावरील रूममधील या पाच जणांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. खाली उभा असलेला योगेश कैलास खरात हा मात्र पोलिसांना पाहून दुचाकीवरुन पळून गेला.
पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल लक्ष्मण पारे ( वय 30 कोपरगाव ) , सोमनाथ तुकाराम गायकवाड ( वय 23 रामवाडी तालुका कोपरगाव ), सुनील शिवाजी दुशिंग ( वय 27 भगूर, तालुका, वैजापूर ), धनंजय प्रकाश काळे ( भोजडे चौकी, तालुका कोपरगाव ), तसेच एका अल्पवयीन मुलगा या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक गावठी बनावटीचे पिस्तूल एक चाकू तसेच एक दुचाकी असा एकूण सत्तर हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची शिर्डी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. या पकडलेल्या सर्व आरोपीं विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे हे करत असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस आधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.