अहमदनगर- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदुपासून जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तू विक्री इत्यादी दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये - जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्रशासनाने लागू केलेली बंधने आणि नियम नागरिकांनी काटेकोर पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या सर्व ठिकाणचे प्रवेश सील केलेले आहेत. याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी येथील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.