अहमदनगर (शिर्डी) PM Modi Shirdi Visit :सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. यात राजकीय नेत्यांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असतो. मात्र,जेव्हा राज्यासह देशातील कोणतेही राजकीय नेते साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असतील तेव्हा साईबाबा मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांना हाकलण्यात येतं. मात्र असं न करता शिर्डी साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांनी शिर्डीतील भटक्या कुत्र्यांची चांगल्या पद्धतीनं कुठेतरी कायमस्वरूपी व्यवस्था करायला पाहिजे, असं महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार सन्मानित पक्षी प्राणी मित्र सुशांत घोडके म्हणाले आहेत.
भटक्या कुत्र्यांचं संगोपन करावं : देशातील दोन नंबर आणि राज्यातील एक नंबरचं श्रीमंत साईबाबा देवस्थान आहे. साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेनं शिर्डीतील आणि मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांसाठी शिर्डीत किंवा शिर्डीच्या जवळपास कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांचं संगोपन करायला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रपतींचा गाड्यांचा ताफा साईबाबा मंदिरात जात असताना एक कुत्रे ताफ्याला आडवे पळत असल्यानं पोलिसांची मोठी धांदल उडाली होती. यामुळे साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदनं या भटक्या कुत्रांची कायमस्वरूपी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी असंही घोडके म्हणाले आहेत.