अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना पेट्रोल पंप मॅनजेरची हत्या झाली आहे.कोपरगाव तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील मे गुरुराज पेट्रोल पंपावर गुरूवारी रात्री 9 वाजण्याचा सुमारास काही तरुण दुचाकीवर आले होते. तेव्हा किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि त्या तरुणांची बाचाबाची झाली. त्या तरुणांनी थेट चाकू काढत गुरुराज पेट्रोल पंपाच्या मॅनेजर वर हल्ला चढवला. त्यांनी वार केल्याने भोजराज घनघाव हा 39 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. त्यानंतर ते तरुण पंपावरून पसार झाले. त्यांच तरुणांनी पुढे दसरतवाडी येथील हॉटेल साई भक्तीच्या संतोष मोरे नामक कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यात तो तरुण सुद्धा गंभीर जखमी झाला आहे.
किरकोळ कारणातून घडली हत्या :दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलवत जखमींना तातडीने शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हालवले. हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच रस्त्यात पेट्रोल पंप मॅनेजर भोजराज घनघाव या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर हॉटेल कर्मचारी संतोष मोरे गंभीर जखमी असल्याने याचावर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. वादाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मात्र पेट्रोल भरण्यासाठी आले आणि किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याची चर्चा आहे. त्यातून ही हत्या झाल्याचे समजत आहे.