अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील मोहोज देव्हढे येथील एका ४५ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आज आला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून नवा रुग्ण नसल्याने प्रशासनला हायसे वाटत असतानाच शुक्रवारी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाथर्डी तालुक्यातील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा चिंतेत पडले आहे.
वाशी मार्केटला शेवगा घेऊन गेला, येताना कोरोना आला! जिल्ह्यात आता ४४ रुग्ण - news about corona virus
अहमदनगर जिल्ह्यातील मोहज देव्हढे येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 झाली आहे.
मोहोज देव्हढे येथील ही व्यक्ती पिकअप व्हॅनमधून शेवग्याच्या शेंगा घेऊन वाशी मार्केटला गेली होती. तेथून आल्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून त्याचा स्वॅब नमुना पुण्याला तपासणीसाठी पाठवला होता, तो पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४४ झाली आहे. नगर शहर, जामखेड, संगमनेर, नेवासे, कोपरगाव या तालुक्यानंतर पाथर्डी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व अंतरजिल्हा सीमावरील बंदोबस्त अजून कडक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १५५९ रुग्णांच्या स्त्राव तपासण्या झाल्या असून त्यातील १४८१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण ४४ बाधित रुग्णांपैकी २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील एका रुग्णावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.