शीर्डी (अहमदनगर) -साईबाबांच्या दर्शानासाठी शिर्डी मध्ये गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मंदिर परिसरातील पास वितरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थांनने घेतला आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ही माहिती दिली आहे.
शिर्डी मंदिर परिसरातील पास वितरण केंद्र सुट्टीच्या दिवशी राहणार बंद - News about Shirdi Temple Entrance Pass
शिर्डी मंदिर परिसरातील पास वितरण केंद्र गुरुवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी बंद राहणार आहे. या दिवसांमध्ये भाविकांची अलोट गर्दी होत असल्याने मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र, 16 नोव्हेंबर पासून साईबाबांचे मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. मंदिरातील दर्शनाची सुविधा ही मर्यादित स्वरूपाची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शन दिले जाऊ शकते. त्यामुळे साईबाबा दर्शनासाठी येताना पुर्वनियोजन करुन व संस्थानचे online.sai.org.in संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करुन दर्शनास यावे, असे वारंवार आवाहन संस्थान प्रशासनाने सातत्याने केले आहे. मात्र, त्यानंतरही साईबाबांचे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी विशेषतः गुरुवार , शनिवार , रविवार आणि सण अथवा सुट्टयांच्या दिवशी होत असल्याने दर्शन व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.
शिर्डी येथे दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी आणि इतर सण व सुट्टयांच्या दिवशी साईबाबांच्या दर्शनास भक्तगणांनी संकेत स्थळावर जाऊन सशुल्क व निशुल्क दर्शनपास / आरती पास आरक्षित करूनच येणे बंधनकारक आहे. या दिवशी म्हणजेच गुरुवार , शनिवार , रविवार तथा सुट्टया व सणांचे दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत असल्याने साईबाबा संस्थान शिर्डी येथील पास वितरण केंद्रे गर्दी नियंत्रण करण्यासाठी बंद ठेवण्यात येतील. शिर्डीत पायी पालख्यांचे प्रमाणही अभुतपूर्वरित्या वाढत आहे. त्यामुळे समस्त पालखी मंडळांनी देखील शिर्डीत पालख्या आणण्याचे टाळावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.