शिर्डी - शेतकरी बांधव अडचणीत आहेत. मात्र, त्यांनी खचून जाऊ नये आणि आत्महत्यासारखे निर्णय घेऊ नयेत, असे आवाहन पद्मश्री पोपटराव पवारांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱयांशी संवाद साधण्याची गरज असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळेत 'अरे बळीराजा करू नको आत्महत्या'ही कविता सादर केली होती. काही वेळातच समाज माध्यमावर ती कविता व्हायरल झाली आणि त्यानंतर दोन तासांनी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी या गावात घडली आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात उल्लेखणीय काम करणाऱया आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या पोपटराव पवार यांनीही शेतकऱयांनी खचून न जाता आत्महत्येसारखा शेवटचा मार्ग पत्कारू नये, असे आवाहन केले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांशी सवांद साधण्याची गरज असून जीवन बहुमुल्य आहे. आलेल्या संकटात अडचणीतून सामोरे जाण्याची क्षमता शेतकऱयांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. तसेच यासाठी समाजानेही त्यांच्यासोबत संवाद साधत मानसिक आधार देण्याची आज गरज असल्याचे पोपटराव पवारांनी म्हटले आहे.