अहमदनगर -राहाता तालुक्यातील लोहारे येथे लिक्वीड अभावी बंद असलेल्या ऑक्सिजन प्लांटला आज दहा टन लिक्वीड उपलब्ध झाले. त्यामुळे याठिकाणी तातडीने ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे राहाता व कोपरगाव तालुक्यातील रूग्णांना संजीवनी मिळाली आहे.
लिक्विड मिळाल्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू -
राहाता तालुक्यातील लोहारे येथील भाऊराव पोकळे या तरुणाने दोन वर्षे अविश्रांत मेहनत घेवून साईराज गॅसेस या नावाने ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने प्रशासन व लोकप्रतिनीधींनी लक्ष घालून तातडीने या प्लांटला परवाना मिळवून दिला. मात्र, या प्लांटसाठी मेडीकल लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे हा प्लांट बंदच होता. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी राहाता, शिर्डी, कोपरगावा तालुक्यांत निर्माण झालेल्या ऑक्सिजन आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लिक्वीड ऑक्सिजन मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. आज गुजरातवरून एक दहा टनाचा टँकर उपलब्ध झाल्याने आता या प्लांटमध्ये ऑक्सिजन उत्पादन सुरू करण्यात आले आहे.