अहमदनगर -पाथर्डी तालुक्यातील मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने गुरुवारी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर रविवारी बटुळे यांच्या कुटुंबीयांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले.
बटुळे कुटुंबीयांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली... हेही वाचा...हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही
मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन तास आधी त्यांचा तिसरीत शिकणारा मुलगा प्रशांत याने शाळेत कविता सादर केली होती. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीमध्ये राहणाऱ्या बटुळे यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले. हे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आपले जीवन संपवले होते. रविवारी बटुळे यांच्या कुटुंबीयांची प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली, यावेळी त्यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आपण व आमदार मोनिका राजळे हे घेणार आहोत, असे सांगितले.
तर त्यांना दांडक्यांनी मारा....
दरेकर यांनी कुटुंबीयांसोबत बातचीत केली. त्यावेळी मल्हारी बटुळे यांच्या आईने आपले अश्रू आवरत, माझा मुलगा खूप तणावाखाली होता. बँकेचे अधिकारी सतत फोन करत होते. पैशासाठी धमक्या देत होते असे सांगितले. यावर प्रवीण दरेकर यांनी सांगितले, जर आता पुन्हा त्या अधिकाऱ्यांचे फोन आले तर त्यांना दांडक्याने मारा, असा सल्ला दिला.
मल्हारी बटुळेंच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च दरेकर करणार...
आत्महत्या केलेल्या बटुळे यांना मुलगा आहे. वडिलांचे छत्र हरवल्याने त्याचा मोठा आधार तुटला आहे. त्याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी प्रवीण दरेकर यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी मुलांना चांगला अभ्यास करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, खचून जाऊ नका अशा शब्दात आधार दिला. तसेच बटुळे यांच्या कुटुंबीयांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना दिल्या.
यावेळी गावातील ग्रामस्थ, तहसीलदार नामदेव पाटील, उप जिल्हाधिकारी देवदत्त केकान, खरवंडी कासारचे तलाठी जालिंदर सांगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे आदी नेते उपस्थित होते.