शिर्डी(अहमदनगर) - साईबाबा मंदिर येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. त्या दृष्टीने दिवसाला 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 10 हजार ऑनलाइन आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देऊन दर्शन देणार असल्याचे साई संस्थानने जाहीर केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काही तासाच्या आतच हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन घेता येणार आहे. तसेच साई संस्थानने प्रसादालय सुरू ठेवण्याचा निर्णयही आता रद्द करण्यात आला आहे.
- साई संस्थानचा तो निर्णय बदलला -
शासनाच्या आदेशानंतर साईमंदिर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासुन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीने दर्शन मिळेल या निर्णयाची भाविकांना प्रतिक्षा होती. आज सकाळी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पत्रकार परिषद घेत, दिवसभरात 10 हजार भाविकांना ऑनलाइन पासेसद्वारे आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देत दर्शन देण्याचा निर्णय झाला होता. तसेच एका आरतीला 10 ग्रामस्थ आणि 80 ऑनलाइन पासेस घेतलेल्या भाविकांना उपस्थिती देण्याचा तसेच प्रसादालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
हेही वाचा -शिर्डीचे साई मंदिर सात ऑक्टोबरपासून होणार खुले; तयारीला सुरुवात