अहमदनगर - रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सुत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात खंडणी व बदनामी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने ही तक्रार दिली असून, यात एका शासकीय विभागाचा डॉ. भागवत दहिफळे यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार महिलाही या खात्यात कंत्राटी नोकरदार म्हणून कार्यरत होती.
असा आहे आरोप-
'बोठे याने तिच्या बदनामीच्या उद्देशाने काही जणांना नाहक तक्रारी अर्ज करायला लावून जून 2019 दरम्यान चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या होत्या. शासनाची परवानगी न घेता तुम्ही निवडणूक लढवली, असा खोटा दबाव आणून त्रास देण्याचा बोठेचा उद्देश होता. माझ्यावर भ्रष्टाचार केल्याच्या खोट्या आरोपांचे आपण तेव्हा खंडण केले होते. 9 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकार परिषद घेवून पुराव्यानिशी या बातम्या खोट्या व चुकीच्या असल्याचे सिद्ध केले होते'; असे त्या तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
बोठे विरुद्ध महिलेची बदनामी, खंडणीचा गुन्हा दाखल कंत्राटी नोकरी घालवण्यासाठी यंत्रणेवर दबाब आणायचा बोठे-
तसेच नंतर बोठे याने 11 ऑगस्ट 2019 रोजी चर्चा करण्यासाठी तक्रारदार महिलेस बोलावून घेतले. डॉ.भागवत दहीफळे यांच्याकडून सर्व गोपनीय माहिती मिळते, असे बोठे याने तक्रारदार महिलेस सांगितले. यातून बाहेर पडण्यासाठी तडजोड म्हणून बोठे याने तक्रारदार महिलेस 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार महिलेने त्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर त्याने जिल्हा क्षयरोग विभागातून तक्रारदार महिलेची कंत्राटी नोकरी घालविण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणला. या कटात डॉ.भागवत दहीफळे सामील होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावरून बोठे व दहिफळेविरोधात भादवि कलम 384, 385, 500, 501, 34 नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीस दिवसानंतरही बोठे फरारच-
तीस नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा पुणे-नगर रस्त्यावर जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता, या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यातील आरोपींनी या खुनाचा मास्टरमाइंड जेष्ठ पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे असल्याचे जबाबात सांगितले आहे. मात्र त्यानंतर बोठे हा फरार झाला असून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत असली तरी तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एव्हढ्या गंभीर गुन्ह्यातील संशयित मास्टरमाइंड पोलिसांना जंग-जंग पछाडूनही सापडत नसल्याबद्दल सध्या नगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. यापरस्थितीत आता बोठेवर अजून एक गुन्हा दाखल झाला आहे. बोठेचे कारनामे आता उजेडात येत असून त्याने अजून काही फसवणूक आदी प्रकार केले असल्यास उघड होण्याची शक्यता आहे.