अहमदनगर- दोन गटात झालेल्या शाब्दिक वादा दरम्यान गोळीबार झाला. त्यात एक जणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी राहता तालुक्यातील लोणी येथील हसनपूर रस्त्यावरील साई छत्रपती या हॉटेलच्या आवारात घडली. फरदीन कुरेशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी रात्री ९.३० वाजेदरम्यान उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी हे चौघेही राहता लोणी तर, संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शाहरूख शहा पठाण आणि फरदीन उर्फ भैय्या आबू कुरेशी तिघेही राहता श्रीरामपूर असे हे सातही जण दारू पिण्यासाठी व जेवणासाठी साई छत्रपती या हॉटेलमध्ये आले होते. मात्र, हॉटेलच्या आवारातच सातही जणांची आपआपसात शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दिक बाचाबाचीतूनच सातपैकी एकाने फरदीन उर्फ भैय्या आबू कुरेशी याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुरेशी हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री उशिरा उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.