अहमदनगर- अपवाद वगळता बहुतांश वेळी पावसाच्या लहरीपणामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यावर आता आपले शेत सोडून इतर ठिकाणी काम करण्याची वेळ आली आहे. शेतकऱयांना आपल्या मुलांना चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण मिळावे, या माफक अपेक्षेवरही 'पाणी' सोडावे लागत आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतात कोणतेही पीक येईना. त्यामुळे गोठ्यातील गाईंचे निघेल तेवढे दूध डेअरीवर घालायचे आणि मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कसेबसे घर चालवण्याची वेळ बळीराजावर आली आहे. त्यातच चाऱ्याचा गहन प्रश्न आहेच.
बळीराजासोबत एक दिवस : सततच्या दुष्काळाने गवंड्याच्या हाताखाली राबतोय 'बळीराजा'; टाकळी खातगावच्या सोमनाथाची व्यथा अशाच भीषण परिस्थितीचे वास्तव दर्शविणाऱ्या आणि बहुसंख्येने अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांचे वास्तव 'ईटीव्ही भारत'ने नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील सोमनाथ पादिर या शेतकऱ्याच्या रुपाने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले आहे. पाहुयात त्याचा सोबतचा एक दिवस...
अहमदनगर शहरापासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर कल्याण राष्ट्रीय महामार्गलगत आहे टाकळी खातगाव. नगर तालुका हा तसा सततचाच दुष्काळी तालुका. सरासरी पेक्षा कमी पाऊस, सिंचनाचा अभाव आणि त्यामुळे कमी आणेवारी... हे सर्व दुष्काळी निकष शेतकऱ्यांची यथातथा परस्थिती विषद करण्यास पुरेशी समजावी अशीच आहे... विशेष म्हणजे केवळ राज्याला नव्हे तर देशाला जलसंधारणाच्या माध्यमातून विकसित शेती जीवनाचे ओळख करून देणारे आदर्शगाव हिवरेबाजारच्या शिवेवरच आहे हे टाकळी खातगाव..
सोमनाथ भानुदास पादिर यांची चार एकर जिरायती जमीन टाकळी खातगाव शिवारातच आहे. सोमनाथ एक तरुण शेतकरी. पत्नी आणि दोन लहान मुलं असे त्यांचे कुटुंब आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले सोमनाथ आता सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीला आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी तीन एकरात मूग आणि गहू पेरले, एक एकरात सीताफळाची बाग लावली. सोयासायटीच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये पीक कर्ज घेऊन मोठ्या अपेक्षेने त्यांनी लागवड केली. मात्र निसर्गाची अवकृपा कायमच राहिली...
जिरायती शेती, पावसाने फिरवलेली पाठ आणि पाण्याने तळ गाठलेली विहिर... या परिस्थितीत पेरलेली पिके आणि सीताफळाची बाग पाण्याअभावी करपून गेली... या परिस्थितीत जगायचे कसे? हा प्रश्न सोमनाथ यांच्या पुढ्यात आहे. सध्या गोठ्यात असलेल्या तीन गायींच्या दुधावरच सोमनाथ यांचा गृहप्रपंचाचा गाडा कसाबसा चालतोय. दुधाच्या तुटपुंज्या उत्पन्नात मुलाबाळांच्या रोजच्या गरजाही पूर्ण होत नाहीत.. त्यामुळं सोमनाथ यांना बांधकामावर गवंड्याच्या हाताखाली रोजनदारीवर कामाला जावे लागतेय.
सोमनाथ यांची दोन मुलं टाकळी खातगाव येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकत आहेत. बेभरवशाचा शेती व्यवसाय पाहता सोमनाथ आणि त्यांच्या पत्नीला मुलांना शहरातील इंग्रजी शाळेत शिकवण्याचे स्वप्नं होते. मात्र, जिथे रोजचं जगणे कठीण होत असल्याने त्यांना आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले आहे.
आता यंदा काय होणार याची चाहूल उशिराने राज्यात दाखल होत असलेल्या मान्सूनने दिलीच आहे... खरीप हंगामाला उशीर झाल्याने मूग आणि बाजरीची पेरणी आता शक्य नसून..रब्बी हंगामात गहू आदी पिकांच्या पेरणीचा विचार सोमनाथ करताहेत. मात्र, कोणतेही पीक घ्यायचे म्हणजे खिशात किमान दहा हजार रुपये तरी असयाला हवेतच. हे पैसे कसे उभे करायचे याचीही चिंता पादिर कुटुंबाला लागली आहे. एकूणच नेहमीच चिंताग्रस्त असलेला बळीराजा यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा नाउमेद होत आहे... त्यामुळं नको वरुणराजा.. अंत आता पाहू..!, असे म्हणण्याची वेळ सोमनाथ सारख्या हजारो शेतकऱ्यांवर आली आहे....