शिर्डी (अहमदनगर) Ayodhya Ram Mandir: येत्या 22 जानेवारीला देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस उजाडणार आहे. कारण या दिवशी मोठ्या उत्साहात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची देशभरात उत्साही वातावरणात तयारी केली जात आहे. या सोहळ्यानिमित्त नुकतेच अयोध्या येथून आलेला अक्षदा कलश श्री साई समाधी मंदिरात (Shri Sai Samadhi Temple) ठेवण्यात आला. त्यानंतर शनिवारी साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिर उद्घाटनाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे.
11 तास 'श्रीराम जय राम जय जय राम' नामाचा जप :अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत आहे. शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील (Dwarkamai Vrudhashram) आजी आजोबांना या सोहळ्यास प्रत्यक्षरित्या जाणे शक्य होणार नसल्यानं, या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस त्यांनी केला. दररोज 11 तास "श्रीराम जय राम जय जय राम" या नामाचा अविरतपणे जप करण्यास सुरूवात केली. नाम जपातून आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी आपली भक्तीसेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध, निराधार आजी-आजोबांनी आजपासून सुरू केल्याची माहिती, वृद्धाश्रम चालवणाऱ्या किर्तीना यांनी दिली.