अहमदनगर: राज्यात गोवंशात पसरलेल्या लम्पी साथरोग अजून नियंत्रणात आलेला नसला, तरी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवत लम्पीवर नियंत्रण आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
लम्पी मुळे दगावलेल्या जनावरांच्या संख्या पोहचली अडीच हजारापर्यंत ३५ हजारांवर जनावरे आतापर्यंत बाधित:एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजारांपर्यंत जनावरे लम्पी साथरोग बाधित होऊन दगावली आहेत. आतापर्यंत नगर जिल्ह्यात ३५ हजारांवर जनावरे लम्पी बाधित झाली. त्यातील २५ हजारांवर जनावरे बरी झाली आहेत. सध्या जिल्ह्यात ७,६५५ जनावरे बाधित असून त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय पथके उपचार करत आहेत, अशी माहिती अहमदनगर जिल्हापरिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर यांनी सांगितले आहे.
केंद्रीय पथकाची पाहणी आणि सूचना:जिल्ह्यात 4 दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे केंद्रीय पथक भेट देऊन गेले आहे. या पथकाने केंद्राने लम्पी बाबत सुधारित सूचना, उपचार, नियोजन आदींबाबत सूचना जिल्हा पशुसंवर्धन विभागाला केल्या आहेत. केंद्राच्या या सूचनांनुसार जिल्ह्यात लम्पीवर नियंत्रण आणले जात असून माझा गोठा स्वच्छ गोठा अभियान जिल्हाभर राबवले जात आहे. व्हेक्टर कंट्रोल करण्यात येत असून लम्पी आजार पसर्वणार्या चावणार्या माश्यांचे निर्मूलन करण्यासाठी फोगिंग करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.कुमकर यांनी दिली आहे.
पशुसंवर्धन मंत्र्यांच्या जिल्ह्यात लम्पीची मोठी व्याप्ती: नगर जिल्ह्यातील असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडेच पशुसंवर्धन विभाग आहे. त्यांच्याच जिल्ह्यात लम्पीने उग्ररूप घेतलेले दिसून येत आहे. राज्यात बुलढाणा, जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यात लम्पिग्रस्त बाधित जनावरांची संख्या आणि हानी जास्त आहे. विखें यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांनी अशा सर्वच जिल्ह्यात प्रत्येक्ष भेटी देऊन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना साथरोग असल्याने गांभीर्याने कार्यरत रहाण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या असून लम्पीवर लवकरच नियंत्रण आणून राज्य लम्पीमुक्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.