महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2019, 7:15 PM IST

Updated : Oct 24, 2019, 11:25 PM IST

ETV Bharat / state

उत्तर अहमदनगरमध्ये आघाडीने राखला गड, विखे-पाटलांचा फार्म्युला फेल

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली होती. एकूण बारा विधानसभा मतदारसंघाचा आज फैसला झाला. यात आघाडीला पाच तर युतीला एक जागा मिळाली आहे.

उत्तर अहमदनगरचे विजयी उमेदवार

अहमदनगर -जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली होती. एकूण बारा विधानसभा मतदारसंघाचा आज फैसला झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या पंचवार्षीकला भाजपकडे दोन जागा होत्या तर यावेळी मात्र भाजपला फक्त एक जागा मिळाली आहे. आगोदर काँग्रेस आणि आता भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने युतीला एकच जागा मिळाली.

मतदारसंघाचे नाव विजयी उमेदवार पक्षाचे नाव
श्रीरामपुर लहू कानडे

काँग्रेस

अकोले डॉ. किरण लहामटे रा. काँग्रेस
कोपरगाव आशुतोष काळे रा. काँग्रेस
नेवासा शंकरराव गडाख शेतकरी क्रांतिकारी पक्ष, आघाडी समर्थीत
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील भाजप
संगमनेर बाळासाहेब थोरात काँग्रेस

श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ -

श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा 19994 मतांनी पराभव केला. श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व शिवसेनेकडून उमेदवारी मिळविलेले भाऊसाहेब कांबळे हे मागील निवडणुकीत काँग्रेसमधून निवडून आले होते. त्यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसेनेचे लहू कानडे हे काँग्रेसमध्ये गेले त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. कांबळे यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवत कानडे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांना ऐनवेळी ससाणे गटानेही साथ दिली. कांबळे यांच्या बाजुने गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रचार केला होता. विखे यांच्या टिकेवर ससाणे आणि कानडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान कानडे यांना मतदारांनी कौल दिला आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघ -

पिचड यांचा बालेकिल्ला असलेला अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी 57790 मतानी पिचड यांचा परभव केला आहे. भाजपचे वैभव पिचड यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकिपुर्वी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार निवडून आले होते. यापूर्वी त्यांचे वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झालेले आहेत. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. यावेळी अकोले तालुक्यातील विभाजन रोखण्यास शरद पवारांना यश आले. भांगरे परिवारही लहामटे यांच्या पाठीशी उभा राहिल्याने गेल्या 8 टर्म पासून अकोले तालुक्यावर वर्चस्व असलेल्या पिचड घराण्याचे आज आखेर लहामटे यांनी पराभव केला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ -

कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांचा 847 मतांनी निसटता विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे माजी आमदार अशोक काळे यांचे चिरंजीव आहेत. अत्यंत चुरशीची निवडणूक झाल्याचे पाहयला मिळाली आहे. अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांना 15382 तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना 3432 मते पडली आहेत. राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे आहेत. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. सुरूवातीपासून काळे-कोल्हे यांच्यात फेरीगणीक मतांच्या आघाडीत मागे पुढे होतं होती. शेवटी काळे यांनी 847 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. भाजपकडून स्नेहलता कोल्हे या दुसऱ्यांदा रिंगणात होत्या. 2014 मध्ये पहिल्यांदा त्या निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेचे आशुतोष काळे यांचा जवळपास 30 हजार मतांनी पराभव केला होता. माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई आहेत. काँग्रेसकडून शंकरराव कोल्हे यांनीही मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघ -

नेवासा विधानसभा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार (अपक्ष) शंकरराव गडाख यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा 30373 मतांनी पराभव करत विजयी मिळविला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे मुरकुटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेले गडाख यांचा परभव केला होता. मात्र, आज पुन्हा चित्र बदलेले पहिला मिळाले आहे. मुरकुटे आणि गडाख यांच्यामध्ये प्रचारातही चांगलीच रंगत आली होती. मुरकुटे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या होत्या. गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता त्यांच्याच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविली. त्यांना राष्टवादीने पाठिंबा दिला होता. माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले यांनीही यावेळी गडाखांना पाठिंंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. 2014 च्या निवडणुकीत मुरकुटे यांनी गडाख यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडाख यांनी वर्चस्व मिळविले होते.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ -

शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मोदी लाटेतही 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. याहीवेळी त्यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा दारुण पराभव केला आहे. 2014 ला या मतदारसंघात 76.85 टक्के मतदान झाले होते तर यावेळी 70.67 टक्के मतदान झाले आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ -

संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री व सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत. विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मतं निवडून आले होते. त्यांनी याहीवेळी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा दारुण पराभव केला आहे.

Last Updated : Oct 24, 2019, 11:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details