शिर्डी - राज्यात एककीकडे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत असताना आता डोंगराळ भागातील मुलांचे शिक्षणासाठीही हाल होत आहेत. प्रगत समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पठार भागातील माळेगाव पठार गावच्या रामेश्वरदरा येथील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यायेण्याचा रस्ताच जीवघेणा झाला आहे. शाळेसाठी रस्ताच नाही ( NO Road To Go To School ) अशी स्थिती झाली आहे. रस्त्याअभावी पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखलेच शाळेतून काढून ( Students School Certificates Are Removed )आणले आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही रामेश्वरदरा विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकसहभागातून रस्ता - या परीसरातील स्थानिक दिवसभर मोलमजुरी करतात. आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून त्यांनी लोकसहभागातून रस्ता तयार केला होता. अनेक वर्षे मुले ह्याच रस्त्याचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था होऊन चालणेही कठीण होते. नागरिकही किती वेळा स्वखर्चाने हा रस्ता दुरूस्त करणार? हा रस्ता वनविभाग हद्दीतून असल्याने या रस्त्याचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी मिळवली. मात्र तरीही स्थानिक लोकप्रतिनिधीचs या रस्त्याकडे लक्ष नसल्याचs गावकरी सांगतात. निवडणुका आल्या की राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी रात्री अपरात्री रस्ता शोधत शोधत आमच्या घरी येतात. मात्र निवडणुका झाल्या की, हे सर्व विसरुन जातात, असा संतप्त सवाल येथील नागरिक साईनाथ धादवड यांनी केला आहे.