शिर्डीत पुन्हा लॉकडाऊन नको, भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांची मागणी - ग्रामस्थ व भाविकांची मागणी
शिर्डी जवळील अनेक गावे आता लॉकडाऊन होऊ लागली आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर मंदिर बंद झाल्याने आता शिर्डीचे साई मंदिरही बंद होईल का, अशी चर्चा सुरू आहे. सरकारचे आदेश आले तर साई मंदिरही बंद होईल. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्यास सांगितल्याने साईं मंदिरही सुरू राहणार की बंद, हे राज्य सरकारच्या निर्णयावरच अवलंबून आहे.
शिर्डी (अहमदनगर) -शिर्डीतील आर्थिक समीकरण पुन्हा एकदा विस्कटल्याने पुन्हा शिर्डीत लॉकडाऊन नको, अशी भुमिका ग्रामस्थ आणि साईभक्तांची आहे. मात्र कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने शिर्डीही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आणि देश लॉकडाऊन झाला होता. या लॉकडाऊनचा फटका साईनगरीत मोठ्या प्रमाणात बसला. येथील व्यवसाय पूर्णपणे भाविकांवर अवलंबून असल्याने ठप्प झाले होते. साई मंदिरच बंद झाल्याने भाविक शिर्डीत येत नसल्याने अखेर हजारो बेरोजगार झाले. त्यानंतर तब्बल वर्षाभराने सर्वकाही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. नगर जिल्ह्यात परत रात्रीची संचारबंदी लागू झाली. त्यामुळे साईमंदिरात दर्शनाचा कालावधीही घटला गेलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे शिर्डीतील भाविकांची संख्या रोडवली असून अनेकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहे. पुन्हा आता लॉकडाऊन होईल का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या शिर्डीत फारसे भाविक येत नसल्याने अघोषित संचारबंदीच सुरू असल्याने लॉकडाऊन शिर्डीत तरी नको, अशी मागणी होत आहे.