महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारदरा घाटघर परिसरात काजव्यांचा लखलखाट; कोरोनामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ

शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत.

fireflies festival
भंडारदरा घाटघर परिसरात काजव्यांचा लखलखाट

By

Published : Jun 12, 2020, 4:15 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची चमचम असते. लखलख करणाऱ्या काजव्यांचा अद्भूत देखावा पाहण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यासह बाहेरूनही हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनामुळे पर्यटकांसाठी काजवा महोत्सव आयोजित केला नाही. हा काजवे महोत्सव पाहूया ई टीव्ही भारतच्या माध्यमातून.

हिरवागार निसर्ग, अंधार आणि या अंधारात अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात काजव्यांचे लखलखते तेज जणू निसर्गाचे रुपच बदलून टाकते. शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. या झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो. आणि सूरही आहे. जणुकाही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवनगाणे गाताहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जात आहे.

काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणारऱया बागडणाऱ्या काजव्याला दोन मोठे डोळे असतात. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरू होते. हा काजवा फक्त १५ दिवसच जगतो.

भंडारदरा घाटघर परिसरात काजव्यांचा लखलखाट

भंडारदरा परिसरातील रमणीय निसर्गातील काजवा महोत्सव पाहण्यासाठी राज्यातून अनेक पर्यटक येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details