अहमदनगर- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा हल्ला केला. पक्षाला राष्ट्रवादी नाव देऊन शरद पवार जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत. पवार विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहत आहेत. तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीने फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मात्र, शरद पवारांना नेमके झाले तरी काय? देशासाठी तुम्ही काँग्रेस सोडली आणि आता त्यांच्याशी हातमिळवणी केली, अशी टीका त्यांनी पवारांवर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले असतानाही पवारांना झोप कशी येते? असा सवालही त्यांनी पवारांना केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे जम्मू-काश्मीरला भारतापोसून तोडणाऱ्यांच्या बरोबर असल्याचा आरोप त्यांनी केला.