अहमदनगर - परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लंके यांच्या पक्षप्रवेशामुळे गेली १० वर्षे शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे. लंके शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आहेत. आमदार औटी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठे संघटन तयार केले आहे.
पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मोठी गर्दी दिसून आली. यावेळी बोलताना लंके यांनी औटी यांच्याकडून तालुक्यामध्ये मोठी दहशत निर्माण केली जात असल्यामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले. तसेच आता खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे मत मांडले.