अहमदनगर - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी? याबाबत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली.
बालकांसाठी जिल्हा रुग्णालयात 100 आयसीयू
'1 ते 18 या वयोगटातील कोरोना बालरुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 आयसीयू खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 25 शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 10 खाटांची सुविधा केली जात आहे. यासाठी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य तिसऱ्या लाटेत बालरुग्णांना सुविधा देण्यात येणार आहेत', अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी ईटीव्ही भारतला दिली.
बालरुग्णांची आकडेवारी
'एप्रिल आणि मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या जास्त होती. त्या तुलनेत बालरुग्ण 8 ते 10 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 बालके दगावली आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत 8 ते 10 टक्के 1 ते 18 वयोगटातील बालरुग्ण ही सामान्य बाब आहे. सर्वत्र हिच परिस्थिती आहे. मात्र, ही आकडेवारी वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित बालकांचे प्रमाण वाढत आहे. तीन महिन्यात १८ हजार बालकांना कोरोना झाला. तर एकट्या मे महिन्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली', अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांनी दिली.
हे प्रमाण चिंताजनक
तर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. नगरमध्ये मे महिन्यात एकूण ८० हजार ७८५ नागरिकांना संसर्ग झाला होता. या तुलनेत मुले बाधित होण्याचे प्रमाण प्रमाण ११.६५ टक्के होते, असेही त्यांनी म्हटले आहे.