महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी 9 नवे रुग्ण, कोरोना बधितांचा आकडा 17 वर - अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण

यातील दोन परदेशी व्यक्तीपैकी एक इंडोनेशिया येथील तर दुसरा जिबुटी येथील आहे. या व्यक्तींनी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

new corona positive tested in ahamadnagar, number rises 17
अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी 9 नवे रुग्ण, कोरोना बधितांचा आकडा 17 वर

By

Published : Apr 3, 2020, 8:42 AM IST

अहमदनगर -जिल्ह्यात गुरुवारी आणखी 9 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे. कोरोना बाधित आढळलेल्या 9 जणांमध्ये दोन परदेशी व्यक्ती असून 4 जण संगमनेर, एकजण जामखेड येथील असून आणखी 2 जण मूळचे कोटा (राजस्थान) आणि भोपाळ (मध्य प्रदेश) येथील आहेत. ते सध्या नगर शहरातील मुकुंदनगर येथे राहात होते.

मुकुंदनगर येथे राहणारे हे दोघे या परदेशी व्यक्तींचे भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे बुधवारी सकाळपर्यंत ११२ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील बहुतांशी स्त्राव चाचणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. त्यात नऊजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील दोन परदेशी व्यक्तीपैकी एक इंडोनेशिया येथील तर दुसरा जिबुटी येथील आहे. या व्यक्तींनी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते संगमनेर आणि मुकुंदनगर येथील व्यक्तींच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी 9 नवे रुग्ण, कोरोना बधितांचा आकडा 17 वर

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या असून संगमनेर आणि मुकुंदनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत.

नगर जिल्ह्यात आलेले २९ परदेशी नागरिक निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यापैकी आतापर्यंत ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विदेशी नागरिकांसह ४६ जणांना शोधण्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तत्परता दाखवली असून ४६ पैकी ३५ नागरिकांना यापूर्वीच जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उर्वरित ११ जणांनाही गुरुवारी सकाळ पर्यंत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने ४३७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल १४ दिवसानंतर निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. उर्वरित रुग्णांना आता बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details