अहमदनगर- विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पंतप्रधान मोदींच्या सभेत झालेल्या जाहीर अपमानाचा बदला येथील जनता निश्चित घेणार आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उत्तरेतून झालेले आक्रमण जनता परतवून लावेल आणि आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केला.
खासदार गांधीच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदार परतवून लावतील - अंकुश काकडे - अहमदनगर
पंतप्रधानांनी शेतकरी, रोजगार आदी विषयांवर दिलेल्या आश्वासनावर एकही शब्द न बोलता केवळ व्यक्ती द्वेषातून शरद पवार यांच्यावर टीका केली, असेही काकडे म्हणाले.
![खासदार गांधीच्या अपमानाचा बदला घेत उत्तरेचे आक्रमण दक्षिणेचे मतदार परतवून लावतील - अंकुश काकडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2997195-thumbnail-3x2-ahmednagar.jpg)
संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरात संपूर्ण दिवसभर प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमध्ये उमेदवार संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे आणि इतर अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. माध्यमांशी बोलताना अंकुश काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी पार पडलेल्या सभेवर टीका केली. पंतप्रधानांनी शेतकरी, रोजगार आदी विषयांवर दिलेल्या आश्वासनावर एकही शब्द न बोलता केवळ व्यक्ती द्वेषातून शरद पवार यांच्यावर टीका केल्याचे सांगितले.
भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा व्यासपीठावर झालेला अपमान येथील जनता विसरणार नाही. मतदानातून भाजपला धडा शिकवण्याचे काम येथील जनता करेल. गेल्या २ निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात अपयश आले असले तरी यावेळेस संग्राम जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षाचा खासदार विजयी होवून दिल्लीत जाईल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.