अहमदनगर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार वैभव पिचड यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात पार पडली. यावेळी वैभव पिचड यांच्या उपस्थितीत अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना राजीनामे पाठविण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीला गळती सुरूच, 'हा' आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार? - वर्षा
आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये या चर्चांना उधाण आले
आमदार वैभव पिचड यांनी मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (२६ जुलै) दुपारी तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली. बैठकीला आमदार वैभव पिचड हे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, अशा आशयाची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.
उद्या (शनिवारी) पंकज लॉन्स येथे अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी दिली. कार्यकर्त्यांचा मेळाव्यानंतर वैभव पिचड आपला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात असले, तरी मंगळवारी (३० जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.