अहमदनगर - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी इतरांना मोठमोठे सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते पाहावेत. आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये, आजोबांच्या खांद्यावरून खाली उतरा आणि मग आपली उंची मोजा अशी बोचरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर केली होती. त्यावर आता रोहित पवारांनी पलटवार केला आहे. तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही; असा प्रतिहल्ला रोहित पवारांनी पडळकरांवर केला आहे.
पडळकरांच्या टिकेनंतर आमदार रोहित पवारांचा पलटवार; म्हणाले... - mla rohit pawar gopichand padalkar
भाजपा विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ टाकत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टिका केली होती. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे.
आमदार रोहित यांनी आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत पडळकरांना आपल्या शैलीत पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले, 'माझे मित्र गोपीचंद पडळकरजी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडिओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण, या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे म्हणजे भाजपाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.' हे राम शिंदे यांचे नाव न घेता आमदार रोहित यांनी संदर्भ दिला आहे. तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना (राम शिंदे यांना) विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत', असे रोहित पवार म्हणाले.
- https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1035327653597643
तसेच 'आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय. ते म्हणजे, या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय. त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच'. अशी पोस्ट करत आमदार रोहित पवारांनी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे.