अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. आताही ते सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या एका हटके घोषणेमुळे चर्चेत आले आहेत. पारनेर मतदारसंघातील जी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करेल, अशा ग्रामपंचायतीला आमदार लंके आपल्या आमदार निधीतून पंचवीस लाखांची मदत करणार आहेत. यासाठी त्यांनी सध्या मतदारसंघातील गट निहाय गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् आमदार निधीचे पंचवीस लाख मिळवा..!! - पारनेर मतदार संघ
पारनेर मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल,त्या ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये निधी देणार असल्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे. सर्व गटांना एकत्र करून संघर्ष विरहित आणि तंटामुक्त गाव ठेवण्यासाठी आवाहन आमदार लंके करत आहेत
पारनेर मतदारसंघात एकशे दहा (110) ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. किमान पंचेचाळीस ते पन्नास ग्रामपंचायतीकडून निश्चित प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आमदार लंके यांना आहे.
राळेगणसिद्धी, हिवरेबाजार ग्राम पंचायतीचाही समावेश-
आमदार लंके यांच्या मतदारसंघात अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी, पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार ही आदर्शगावेही आहेत. अण्णांमुळे राळेगणसिद्धी आणि पोपटराव पवार यांच्यामुळे हिवरेबाजार या गावांनी नेहमीच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राळेगणसिद्धी मध्ये पक्षीय पातळीवर दोन गट आहेत, मात्र अपवादात्मक निवडणुका झाल्या तरी हे दोन्ही गट अण्णांच्या शब्दा बाहेर न जाता मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका पार पाततात, अण्णांनी सुद्धा कुणाला पाठिंबा न देता लोकशाही प्रक्रियांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.