अहमदनगर- अहो चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा, मग मेहबूब शेख आणि आमदार निलेश लंके यांना शिकवा, असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर घणाघात करत खोचक टीका केली. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि आत्मा कमिटी अध्यक्ष ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमात शेख बोलत होते. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री तनपुरेंच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वनकुटे गावातील विकास कामांचा शुभारंभ राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मेहबूब शेख यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
चांगल्या व्यक्तीला बदनामीची सुपारी
यावेळी बोलताना, पूर्वी आपण चित्रपटात बघितले असेल की, एखाद्याला सुपारी दिली जायची मात्र आता वेगळ्या पद्धतीने सुपारी दिली जाते आणि ती म्हणजे चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याची, असे शेख म्हणाले. चित्रा वाघ दिवस-रात्र माझ्याही नावाचा जप करतात. आमदार निलेश लंके आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबत ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण पुढे आणण्यात आले तशाच पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप त्यांनी केले होते. त्यावेळी मी माझी नार्को टेस्ट करा सत्य समोर येईल, असे आव्हान त्यांना दिले होते. आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याआधी आपल्या लाचखोर पतीला नीतिमत्ता शिकवा, अशी घणाघाती टीका शेख यांनी केली. चित्रा वाघ यांच्या पतीने मेलेल्या माणसाच्या प्रकरणात लाच मागीतली आहे, पोलीस दप्तरी याची नोंद आहे, माझ्याबद्दल एक पुरावा तुम्हाला देता आला नाही, असा दावा शेख यांनी यावेळी केला.