अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्हातील चौंडी येथे आज होणाऱ्या सोहळ्यास पवारांचे नातू व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल चढवणारे विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार आणि पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
गोपीचंद पडळकरांनी कालच केला होता आरोप:गोपीचंद भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी कालच पवारांवर मोठा आरोप केला होता. अहिल्यादेवींच्या जयंतीला रोहीत पवार व शरद पवारांनी राजकीय स्वरूप दिल आहे. असा आरोप काल गोपीचंद पडळकरांनी केला होता. आता यावर शरद पवार व जामखेडचे आमदार रोहीत पवार काय म्हणतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गोपीचंद पडळकरांना रोहीत पवारदेखील काय उत्तर देतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले थोर कार्य : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावात झाला. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. मात्र, शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल आणि गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला.