अहमदनगर (शिर्डी) : Navratri 2023 : नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचं महत्वाचं व्रत होय. तुळजापूरची भवानी, (Tulaja Bhavani) माहूरची रेणुका, (Renukadevi) वणीची सप्तशृंगी (Saptashrungi Devi) आणि कोल्हापूरची अंबाबाई या (Kolhapur Mahalaxmi) साडेतीन शक्तीपीठांमध्ये (Sadetin Shakti Peeth) नवरात्र उत्सवात भाविकांनी एकच गर्दी केलीय. अशा या गर्दीत भाविकांना तासंतास दर्शनासाठी ताटकळावं लागतंय. या सर्व शक्तीपीठांचं जर तुम्हाला एकाच ठिकाणी दर्शन मिळालं तर कसं वाटेल? आणि हे खरं शक्य आहे. शिर्डी-शनिशिंगणापूरची वारी करताना ते साध्य होतं. या दोन तिर्थस्थळांच्या मार्गावरच कोल्हार भगवतीपूर यथे (kolhar Bhagwatipur) भगवती माताचं मंदिर आहे. जेथे या सर्व आदीशक्ती एकवटल्या आहेत.
अशी आहे आख्यायिका : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर (Bhagwati Mandir Kolhar) येथे भगवतीमातेचं तीन शक्तीपीठ एकत्रित असलेलं स्थान आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव स्थान आहे. या ठिकाणी भगवतीमातेचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सवात देवी भक्तांची रीघ लागते. आज भगवतीमातेचं हे मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान म्हणून ओळखलं जातं. पूर्वी मंदिर हेमाडपंथी होतं, परंतु काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय आणि त्याला नवीन स्वरूप मिळालंय. नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात महिला मंदिरातच घट बसवतात आणि नऊ दिवस मंदिर हेच त्यांचं सर्वस्व असतं. नवसाला पावणारी म्हणून देवीभक्त आपला नवस फेडण्यासाठी घट बसवतात, अशी यामागची मान्यता आहे.