महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरेंद्र मोदींची आज अहमदनगरमध्ये सभा, राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण - VIKHE PATIL

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेवेळी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जिल्ह्याभरात रंगल्या आहेत.

नरेंद्र मोदी आणि राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : Apr 12, 2019, 8:05 AM IST

Updated : Apr 12, 2019, 11:42 AM IST

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची अहमदनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. अहमदनगर दक्षिणेमधील उमेदवार सुजय विखे, शिर्डीमधील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आला आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता अभय शेळके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे,साई संस्थानचे विश्वस्त बिपिनराव कोल्हे, यांनी त्यांचे स्वागत केले.

साई समाधी दर्शन घेऊन मोदी हेलिकॉप्टरने नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांनतर आर्मड स्कूल अ‍ॅण्ड सेंटर येथील हेलिपॅडवर उतरून ते चारचाकी वाहनाने सभास्थळी पोहोचणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या सभेवेळी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जिल्ह्याभरात रंगल्या आहेत.

नगर शहरातील सावेडी भागातील संत निरंकारी मैदानात तब्बल बावीस एकर जागेमध्ये भव्य असा स्टेज उभारण्यात आला आहे. नगर, शिर्डी, बीड या तिन्ही मतदारसंघांना विचारात घेऊन ही सभा आयोजित करण्यात आल्याने या तीनही मतदारसंघातून मतदार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी सभेत काय बोलतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

Last Updated : Apr 12, 2019, 11:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details