अहमदनगर - बकरी ईदनिमित्त राहता शहरातील सर्व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले. यावर्षी महापुरामुळे संकटात सापडलेल्या सांगली-कोल्हापूरसह इतर भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी निधी गोळा केला आहे. तसेच, हा मदतनिधी शासनाकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
बकरी ईद मुस्लीम समाजातील मोठा सण मानला जातो. या दिवशी समाजबांधव सामूहिक नमाजपठण करत असतात. राहता शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी बकरी ईदनिमित्त सोमवार सकाळी ९ वाजता बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण केले. यावेळी, समाज बांधवांनी मौलाना याहीया, मौलाना इब्राहिम, मौलाना रऊफ, मौलाना रफिक, मौलाना अल्ताफ, हाजी रफीक शहा, मौलाना हुजेफा, करीम भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना केली. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्य व देशातील पूरग्रस्तांचे संकट टाळण्यासाठी देखील प्रार्थना केली.