महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ahmednagar Crime : राजूर येथील अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल; पती, भाच्याकडून हत्येची कबुली

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींनी गुन्हे शाखेने अटक केली. कल्याणी जाधव (वय 25 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून तिला तिचा पती आणि भाच्याने चारित्र्यावर संशय घेऊन मारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

Wife Murder Case Ahmednagar
आरोपींना अटक

By

Published : Aug 10, 2023, 9:31 PM IST

अहमदनगर:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथील अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली असून दोन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. 5 ऑगस्ट रोजी कातळपूर शिवार, राजूर येथे 20 ते 25 वर्षे वयाच्या अनोळखी स्त्रीचे प्रेत मिळून आले होते. याप्रकरणी राजुर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु या महिलेस गळा आवळून जीवे मारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अज्ञात आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीने मृतदेहाची ओळख:राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने लागलीच तपास करत असताना घटना ठिकाणी पर्समध्ये सॅनिटरी नॅपकीन आणि गुलाबी रंगाचे पाकिट/रॅपर मिळून आले. त्यावरून पथकाने जिल्हा परिषद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. प्राप्त माहितीनुसार, वैद्यसृष्टी सॅनिटरी नॅपकीन हे महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना देऊन पुढे अनुसूचित जातीच्या महिलांना दिले जाते, अशी माहिती प्राप्त झाली. पथकाने लागलीच महिला अंमलदारांच्या मदतीने अंगणवाडी सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मृत महिलेचे फोटो प्रसारीत केले. त्यावेळी मृत महिला ही वांबोरी, ता. राहुरी येथील कल्याणी जाधव असल्याचे कळले. यानंतर पोलीस पथकाने लागलीच वांबोरी येथे जाऊन कल्याणी जाधव हिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी कल्याणी महेश जाधव ही 4 ऑगस्ट रोजी पांढरीपुल, ता. नेवासा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार सोनई पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती समोर आली.

आरोपींकडून हत्येची कबुली:स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बेपत्ता कल्याणी जाधव हिच्या कुटुंबीयाकडे चौकशी केली. दरम्यान महिलेचा पती महेश जाधव व भाचा मयुर साळवे यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत जाणवल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी खुनाचा उलगडा केला. प्राप्त माहितीप्रमाणे, कल्याणी हिला भंडारदरा येथे फिरवायचे कारण सांगून आरोपी महेश जनार्दन जाधव याने आपला भाचा मयूर अशोक साळवे याच्या मदतीने पत्नी कल्याणीचा खून केला. कल्याणीच्या चारित्र्यावरील संशयावरून तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर खुनाचा उलगडा:या घटनेत महेश जनार्दन जाधव (वय 31 वर्षे) आणि मयुर अशोक साळवे (वय 25 वर्षे, दोन्ही रा. राजवाडा, वांबोरी, ता. राहुरी) यांना राजुर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सतत 3 दिवस प्रयत्न करून खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.

हेही वाचा:

  1. Thane crime : उसनवारीच्या वादातून बहिणीच्या डोक्यात घातली हातोडी, मानेत टोचले इंजेक्शन
  2. Crime News : किडनॅप करुन हॉटेलमध्ये तीन दिवस मुलीवर सामूहिक बलात्कार, वाचा पुढे काय झाले...
  3. Solapur Crime : प्रेम विवाहात अडथळा नको म्हणून मुलीनेच दिली वडिलांचे पाय तोडण्याची सुपारी

ABOUT THE AUTHOR

...view details