अहमदनगर - कोरोना काळात निर्माण झालेली ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परिवार सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारणार असून येत्या दहा दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या ऑक्सिजन प्रकल्पाची घोषणा केली आहे.
'आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प'
सर्वच रुग्णालयापुढे सध्या ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेवून विळद घाटात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
'विळद घाटामध्ये ऑक्सिजन बेड्स वाढणार'
सद्यस्थितीत विळद येथील कोविड केअर सेंटरमध्ये १५० ऑक्सिजन बेड आहेत. नविन ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यानंतर बेडची संख्या ३०० करण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अवघ्या दहा दिवसात कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.