अहमदनगर - शहरातील उड्डाणपुलाचे काम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
'अखेर प्रलंबित उड्डाणपूलाचे काम ऑगस्ट पासून सुरू होणार' नगर शहरातील स्टेशन रोडवरील बहुप्रतीक्षीत उड्डाणपूलाचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. उड्डाणपूलाच्या कामासाठी आवश्यक असलेले संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. उड्डाणपुलाचे काम मार्गी लावले असून आता कोणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेत महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, धनंजय जाधव प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जून, प्रकल्प अधिकारी पी.व्ही.दिवाण आदी उपस्थित होते.
अनेकदा भूमीपूजन
नगर शहरातून औरंगाबाद-पुणे मार्ग जातो. यामुळे मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यातील वाहतूक यामार्गे होते. वर्दळीचा स्वस्तिक चौक ते स्टेटबँक चौक या रस्त्यांवर कायम गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे गेल्या वीस वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, यासाठी आंदोलने झाली आणि अनेक नेत्यांनी उड्डाणपूल होण्यासाठी आश्वासने दिली होती. तर अनेक नेते, मंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाले. मात्र या-ना त्या कारणाने प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही.
यात सर्वात मोठा अडथळा होता तो संरक्षण विभागाचा, कारण या रस्त्याला लागून संरक्षण विभागाची जागा असल्याने संरक्षण विभागाची मंजुरी मिळत नव्हती. अखेर आता संरक्षण विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याने आणि राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देताना केंद्र सरकारने निधी मंजूर केल्याने सर्व अडचणी दूर झाल्याची ग्वाही सुजय विखे यांनी दिली. याचे श्रेय त्यांनी भाजपाच्या केंद्र सरकारसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.