अहमदनगर- रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे मी विमानाद्वारे 15 लाख खर्च करून 2 हजार इंजेक्शन आणले. ते इंजेक्शन जिल्हा रुग्णालय, साईबाबा संस्थान रुग्णालय, प्रवरा रुग्णालय तसेच रूग्णांपर्यंत पोहोचवले, तेही राज्यात आमची सत्ता नसताना. त्यामुळे औषध मिळत नाही, असे ओरडत बसण्याऐवजी कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा, असा खोचक टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला आहे.
शनिवारी खासदार विखे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा, कोळगाव, घारगाव, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, मढेवडगाव येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी लोणीव्यंकनाथ येथील बाळासाहेब नाहटा यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये प्रसारमध्यमांशी बोलताना वरील टोला लगावला.