अहमदनगर- रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत (वय - 60) यांचा मृत्यू झाला आहे. अरूण सावंत यांच्यासह एकूण 30 जण हरिश्चंद्रगडावर रॅपलिंगसाठी आले होते. सावंत हे काल, शनिवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.
ज्या कोकणकड्यावरुन कोसळून अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. 1986 साली घडलेल्या एका दुर्घटनेत सावंत यांनी भर पावसात अजस्त्र कोकणकड्यावरुन रॅपलिंग करुन कड्याखालील मृतदेह काढला होता. गिर्यारोहणाचे कौशल्य आणि अनुभवाचा त्यांनी बचाव मोहिमेसाठी अनेकदा वापर केला होता.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत साई चरित्राच्या प्रती सादर करणार - दिपक मुगळीकर
गोरेगावमधील नामवंत गिर्यारोहक, सह्याद्रीची घोरपड म्हणून ओळखले जाणारे अरुण सावंत हे त्यांच्यासोबत रॅपलिंगसाठी आलेल्या 30 जणांच्या टीमचे नेतृत्व करत होते. शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. इतर 29 जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत दोर लावत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. कोकणकडा जवळपास अठराशे फूट उंच आहे. कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात असताना फोल झाला. त्यानंतर 550 फूट खोल दरीत खडकावर ते पडले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या टीममधील काही जणांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी सावंत यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे आणि लोणावळा येथून 5 रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला.
हेही वाचा -शिर्डी ग्रामस्थांची सद्भावना रॅली..'सबका मालिक एक'चा संदेश
सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं. त्यांच्या 3 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 'सह्याद्री'मधील नव्या वाटा शोधल्या होत्या. लोणावळा येथील 1985 च्या मोहिमेत ड्युक्स आरोहण सर करणारे ते पाहिले गिर्यारोहक ठरले होते. त्यानंतर गिरीमित्र संमेलन 2008 ला त्यांचा गिरीमित्र गिर्यारोहक सन्मानाने गौरव करण्यात आला होता.