अहमदनगर -नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 55 गावठी कट्टे (Gavthi Katta) आणि त्यासोबत डझनावार जिवंत काडतुसे (Jivant Kadtus) पोलिसांनी जप्त (Ahmednagar Police) केली. या गुन्ह्यात विक्रीसाठी आलेले गावठी कट्ट्यांसह आरोपी पकडले गेले, पण जे कट्टे बिनबोभाट विकले गेले त्याचे काय? हा प्रश्न आहे. सोबत नव्या वर्षात पोलिसांनी नव्याने पाच कट्टे, काडतुसे जप्त करत आरोपींना अटक केली आहे. गावठी कट्ट्यांची जिल्ह्यातील काही तालुक्यातील तस्करी, खरेदी-विक्री आणि वापर पाहता नगर जिल्हा हा गावठी कट्ट्यांचा हब बनत चाललाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा - गेल्या वर्षात 50 हून अधिक गावठी कट्टे जप्त-
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी गेल्या वर्षी परिक्षेत्रांतर्गत पाच जिल्ह्यात आदेश काढत अवैध अग्नी शस्त्र(बंदूक, पिस्तूल, गावठी कट्टे आदी) यावर विशेष पथके नेमून कारवाई करण्याचे आदेश काढले होते. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात ही जबाबदारी जिल्हा गुन्हे अन्वेषण आणि पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना देण्यात आली होती. या विशेष मोहिमेत या पथकांनी केलेली कामगिरी पाहता जिल्ह्यात अवैधरित्या गावठी कट्टे राजरोसपणे विक्रीस येत असल्याचे आणि ते अनेक धनिकांनी, अवैध वाळू तस्करी अशा व्यवसायात असलेल्यांनी खरेदी केल्याचे पुढे येत आहे. 2021 वर्षात 50 हून अधिक गावठी कट्टे, शंभरावर जिवंत काडतुसे आणि या विक्री व्यवसायातील अनेकांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.
- नव्या वर्षातही गावठी कट्टे पकडले -
नव्या 2022 या वर्षाच्या पहिल्या महिन्यातील घटना पाहता जिल्ह्यात पोलीस, गुन्हे शाखा, शोध पथके कारवाई करत असले तरी गावठी कट्ट्यांची आवक थांबलेली नाही असेच चित्र आहे. शेवगाव तालुका बोधेगाव येथे भरदिवसा चौकात झालेला तरुणावरचा गोळीबार आणि राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात तरुणाचा गावठी कट्ट्याने झालेला संशयास्पद मृत्यू यामुळे खळबळ उडाली होती. हे कमी काय म्हणून गेल्या दोन दिवसांत तब्बल पाच गावठी कट्टे हे तीन करवायात गुन्हे शाखेने जप्त करून आरोपींना पकडले आहे. तर काही आरोपी कारवाई वेळी फरार झाले आहेत.
- गावठी कट्टे येतात कुठून? पोलीस काय सांगताहेत? -
जिल्ह्यातील मुळा, प्रवरा आणि गोदावरी तीरावर असलेल्या तालुक्यात अर्थात श्रीरामपूर, नेवासे, राहुरी, शेवगाव तालुक्यातील काही ठराविक ठिकाणी या गावठी कट्ट्यांची विक्री करणारी एक साखळी असल्याचे बोलले जाते. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येणारे गावठी कट्टे हे मध्यप्रदेशमधील उमरठी भागातून येत असल्याचे नमूद केले. या उमरठी परिसरातील गावात गावठी कट्टे तयार करून ते एका साखळीमार्फत महाराष्ट्रात विक्रीस येतात. एक कट्टा आणि दोन ते तीन काडतुसे हे वीस ते तीस हजारात विकली जातात. अवैधरित्या आलेली गावठी कट्टे विकण्याच्या साखळीत बेरोजगार तरुण पिढी असल्याचे दिसून येत आहे.
- महाराष्ट्र-एमपी पोलीस राबवणार संयुक्त अभियान-
याबाबत अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले की, येणारे गावठी कट्टे हे मध्यप्रदेशमधून येतात. गुन्हे शाखा आपल्या खबऱयांमार्फत माहिती काढून मोठी कारवाई करत आली आहे. अनेकजण आपल्या स्थानिक अवैध धंद्यात दहशत म्हणून किंवा काहीजण केवळ हौस आणि दरारा वाटावा म्हणून ही अवैध हत्यारे खरेदी करतात. पोलिसांची गुप्त शाखा यावर नजर ठेवून असून उपलब्ध माहितीवर तातडीने कारवाई सुरू आहेत. अवैध गावठी कट्ट्यांचा स्रोत हा मध्यप्रदेशमधील असल्याने नाशिक परिक्षेत्र आणि मध्यप्रदेशमधील पोलीस आता याविषयावर संपर्कात असून, यावर लवकरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
- मूळ स्त्रोतावर घाला करणे गरजेचे-
याबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही माहिती देताना गावठी कट्टे हे परराज्यातून येत असून, मूळ स्रोतांवर कारवाई करणे महत्वाचे असल्याचे मत मांडले आहे. तसेच पोलीस चांगली कामगिरी करत असून अनेक अग्नीशस्त्रे जप्त करून गुन्हेगारांवर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
- नागरिकांमध्ये भीती, धडक कारवाईची मागणी-
मुळात हे गावठी कट्टे, ते विकणारे किंवा खरेदी करून बाळगणारे हे नगण्य संख्येत असले तरी अधूनमधून गावठी कट्टे पकडण्यात आलेल्या बातम्या, त्यांचा वापर याबद्दलचे वृत्त सामान्य नागरिकांना भीतीदायक वाटत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावठी कट्टे बाळगणारे मुखत्वे वाळू तस्करी व्यवसायात आहेत. तसेच आता बेरोजगार तरुण वर्गात याचे आकर्षण वाढत आहे. यातून गुन्हेगारीला वाव निर्माण होत असून, यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना काळात तरुणांमध्ये आलेले नैराश्य, बेरोजगारी यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.