अहमदनगर - हिवरे बाजार हे केवळ एक गाव नसून, ते परिपूर्ण विकासाचे आदर्श संकल्पचित्र आहे. हे गाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नावाजलेले आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून हिवरे बाजार या गावाचीओळख आहे. यासाठी या गावाचे सरपंच पोपटराव पवार यांचे महत्वाचे योगदान आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणेच हिवरे बाजार हे गाव सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधींचा अभाव अशा अनेक समस्यांनी या गावातील नागरिकांना ग्रासले होते. मात्र, बाहेर शिकायला गेलेल्या तरुण पिढीपैकी पोपटराव पवार यांनी बाहेर शिक्षण घेल्यानंतर गावातच काम करायचे या निर्धाराने ते गावी परतले. त्यानंतर त्यांनी जोमाने काम सुरू केले आणि अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या हिवरे बाजार गावाचा कायापालट केला. आज आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गांव म्हणून स्वतंत्र ओळख या गावाने निर्माण केली आहे. हिवरे बाजार हे दुष्काळी गांव म्हणून ओळखले जायचे. मात्र, शेजारीच असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात झालेल्या पाणलोट क्षेत्रासारखेच काम हिवरे बाजार गावात पोपटराव पवार यांनी सुरू केले.
- दुष्काळाला दूर ठेवण्यात यशस्वी -
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार ग्रामसभेत मांडण्यात आला. केवळ शासनावर विसंबून न राहता पूर्ण गावाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आसपासचा डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली. दरवर्षी मानसी एक झाड लावण्याचा संकल्प करताना गावाने स्मृतिवन विकसित केले. गावातील मृत व्यक्तींच्या नावाने येथे झाड लावले जाते, त्याचे संगोपन केले जाते. पावसाचे पाणी अडवण्यासाठी पाझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततळी घेतली. काही वर्षात श्रमदानातून लावलेली झाडे आता जंगल वाटावीत एवढी मोठी आणि हिरवीगार झाली आहेत. पाणी अडवा- पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरित्या राबवल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडले-जिरले. त्याचा परिणाम गावातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळीतही वाढ झाली. पूर्वी 90 ते 140 फुटावर लागणारे पाणी आता 35 ते 60 फुटांवर आले आहे. गावात 318 विहिरी आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याने तळाला गेलेल्या विहिरी नितळ पाण्याने भरून गेल्या. पाझर तलाव, शेततळी भरून वाहू लागली. गाव बेसाल्ट खडकावर वसलेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्फोट घडवून आणून जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा निर्माण केली. त्याला जोडून माथा ते पायथा या पद्धतीने पाणी अडवले, पाणी वापराचा ताळेबंद निश्चित केला. त्यातून पाण्याचा संचय वाढला. यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झाले. गावात पाणी आले तसे समृद्धी आली आणि यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारली.
पोपटराव पवारांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावातच काम करायचे या निर्धाराने ते गावी परतले. गावातील सर्व समस्या सोडवायच्या आहेत, पण त्या कशा? यासाठी ते गावाच्या राजकारणात उतरले. पोपटराव पवार गावचे सरपंच झाले. गावात माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा लोकसहभागातून गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न. पोपटराव पवारांचा गाव विकासाचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला.
- मतभेद विसरून एकत्र येऊन काम केले -
गावचा पाणी प्रश्न सुटला तसा गावकऱ्यांनी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेती प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपला मोर्चा वळवला. मतभेद विसरून गाव पोपटराव पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले. गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून काहींनी सेंद्रीय शेती केली. त्यांना झालेला वाढीव लाभ पाहून गावातील इतर शेतकरीही सेंद्रीय शेतीकडे वळाले. पाण्यानुसार खरीपाच्या आणि रब्बीच्या पिकांचे नियोजन झाले. हे नियोजन ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. नियोजनानुसार पिकं घेतल्याने पाणी बचत तर झालीच पण वर्षातून दोन ते तीन वेळा पिकंही घेता येऊ लागली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे उत्पन्न वाढले. गावातील 97 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आज पाच लाख रुपयांपर्यंत आहे. तर 70 कुटुंबाचे उत्पन्न 5 ते 10 लाख रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाची संख्या 56 असून गावातील साक्षरता दर 95 टक्के इतका आहे. 95 शेतकऱ्यांकडे ड्रीप आणि स्प्रिंक्लरची व्यवस्था आहे. गावाचे दरडोई वार्षिक उत्पन्न 99 हजार रुपयांच्या आसपास आहे.
- गावात एकही बेरोजगार नाही -
गावात एकही बेरोजगार नाही किंवा एकही माणूस गावातून स्थलांतरित होत नाही. उलट गाव सोडून गेलेली 48 कुटुंबं 'गड्या आपुला गावच बरा' असे म्हणत पुन्हा गावी परतली आहेत. गावात 108 घरांमध्ये शोष खड्डे आहेत. तर सर्व घरात सांडपाण्याची व्यवस्था आहे. गावाने कपडे धुण्यासाठी 3 ठिकाणी सार्वजनिक धोबीघाट बांधले आहेत. या धोबीघाटातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी फळबागांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- पावसाचे प्रमाण, पाण्याचा साठा मोजण्याचे काम शाळेतील मुलं करतात -
हिवरे बाजार गावातील पावसाचे प्रमाण मोजणे. गावातील पाण्याचा साठा मोजणे, त्यानुसार पिकांची यादी करणे. त्याचा तक्ता करणे. ही सर्व कामे शासकीय अधिकारी करीत नाहीत तर ती करतात गावच्या माध्यमिक शाळेतील मुलं. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. इथली शाळा केवळ पुस्तकी शाळा नाही. इथं मुलांना जीवन, शिक्षण आणि संस्कार दिले जातात. शेती कशी करायची. पाण्याचा वापर कसा आणि किती करायचा. पिकांचं नियोजन कसे करायचे. पाणी साठा कसा मोजायचा हे सगळे शाळेतच शिकवले गेल्याने बालवयातच मुलांच्या मनात विकासाचे संकल्पचित्र पक्कं होण्यास मदत झाली. ही मुलं म्हणजे हिवरे बाजारची पुढची पिढी. ती विकास साक्षर झाली तर गावाचे हे चित्र उद्याही टिकून राहिल.
- शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष घातले-
शाळा झाली, पाणी झाले, संस्कार झाले, शिक्षण-प्रशिक्षण झाले आता गावाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष घातले आहे. उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतीपूरक व्यवसाय हवा या भावनेतून गावात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात आली. गावात दुध डेअरीची स्थापना करण्यात आली. चार-पाच चारा डेपो तयार करण्यात आले. त्यामुळे गावातील जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला. घरटी जनावरांची संख्या वाढली. गावात गुरं आली तसा पशुवैद्यकीय दवाखानाही. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला. गावातील दुध उत्पादन वाढले. पूर्वी गावात होणारं 160 लिटरचं दुध उत्पादन आता 5 ते 6 हजार लिटरच्या आसपास गेले आहे. गावातील जमीन गावाबाहेरील माणसाला विकायची नाही. गावात कोणीही बोअरींग घ्यायचे नाही. गावातील शेती विहिरीतील पाण्यावरच करायची. ऊस केळींसारखी पिकं गावात घ्यायची नाहीत असे ठराव ग्रामसभेत मांडले गेले आणि ते जसे मंजूर झाले तसेच सगळे त्याचे पालनही करत आहेत.
- विवाहापूर्वी मुला-मुलींची एचआयव्ही चाचणी करणे बंधनकारक -
गावात विवाहापूर्वी मुला-मुलींची एचआयव्ही चाचणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण गावाची एकाचवेळी शेतजमीन मोजणी करण्याचे अनोख कामही गावाने केले आहे. 'एक गाव एक स्मशानभूमी' सारखा उपक्रम राबविताना पोपटराव पवारांना मिळालेल्या दलित मित्र पुरस्काराच्या रकमेतून मागासवर्गीय कुटुंबांना स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्यात आली. गावात गेल्या दहा वर्षापासून 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली जाते. नवरात्रीसारखे उत्सव साजरे करताना प्रतिकात्मक छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दरवर्षी नवी मूर्ती विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत तर होतेच, त्याचबरोबर जलप्रदूषणालाही आळा बसतो. गावात उत्सवकाळात घरगुती पुजांमधून निर्माण होणारे निर्माल्य एकत्र करून त्याचा खत म्हणून वापर केला जातो.
- गावात तंटा नाही की दारू -
गावात दारू तसेच गुटखाबंदीची 100 टक्के अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखु, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला नाही तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जात आहे.
- ऊर्जा निर्मिती -