अहमदनगर- प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून पुत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनात अनेक जण उतरले आहेत. आता महारांजाविरोधात संगमनेर सत्र न्यायालयात गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांना समर्थन देणे सुरूच आहे. आज मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी आज संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील इंदुरीकर महाराज यांच्या घरी त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धातास बंद खोलीआड दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला गेला नसला, तरी मनसे इंदुरीकरच्या पाठीशी उभी राहाते का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. इंदुरीकर महाराजांच्या भेटीनंतर पत्रकारांना बोलताना पानसे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.