महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्यातील लसीकरणाचा फज्जा; मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी केला रास्तारोको - अहमदनगर मधील लसीकरणा बद्दल बातमी

अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्यातील लसीकरणाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रास्तारोको केला.

MNS activists staged a road block agitation outside a vaccination center in Ahmednagar
अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्यातील लसीकरणाचा फज्जा; मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी केला रास्तारोको

By

Published : May 3, 2021, 5:00 PM IST

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्याला एक मे पासून परवानगी दिली आहे. अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला. सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. एका छोट्याशा मांडवात उन्हामुळे नागरिकांनी गर्दी केली. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने अखेर नागरिक संतापले. यावेळी तिथे उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण केंद्रा बाहेरील रस्त्यावर ठाण मांडून मनपा प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात लसीकरणासाठी आलेले अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी परस्थिती संवेदनशील होत असताना पोलिसांना लसीकरण केंद्रावर पाचारण करण्यात आले. काही वेळात पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आले. मनपाच्या माळीवाडा भागातील महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्रावर हा प्रकार घडला.

अहमदनगरमध्ये तिसऱ्या टप्यातील लसीकरणाचा फज्जा; मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी केला रास्तारोको

सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण केंद्रावर उडतोय गोंधळ -

एक मे पासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरण कार्यक्रमात शहरात गोंधळाचे वातावरण आहे. शहरातील पाच ठिकाणी मनपाच्या आरोग्य यंत्रणेच्या वतीने लसीकरण केले जात आहे. पहिले दोन दिवस अॅप शिवाय नोंदणी न केलेले नागरिक मोठ्या संख्येने येत आधार कार्ड दाखवून आम्हालाही लसीकरण करा असा आग्रह करत होते. यामुळे लसीकरण केंद्राला जत्रेचे स्वरूप आले होते. त्यात आज तिसऱ्या दिवशी सुरुवातीला पोलीस बंदोबस्त ठेवून केवळ अॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरण रांगेत प्रवेश देण्यात आला. मात्र, लसीकरण सुरू होताच सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण थांबवण्यात आल्याने आज (सोमवारी) पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

तर मनसे रोज केंद्राबाहेर आंदोलन करणार -

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन, महापौर आणि इतर शहरातील पदाधिकाऱ्यांवर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत लसीकरणाकडे कुणाचेच लक्ष नसल्याने कर्मचारी आणि नगरसेवकांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले. अनेक नगरसेवक हे आपल्या जवळच्या लोकांची लिस्ट लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना देत प्राधान्याने लसीकरण करून घेत आहेत, त्यामुळे अॅपवर नोंदणी केलेले सर्वसामान्य नागरिकांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागते किंवा लस संपल्याचे कारण देऊन परत माघारी पाठवले जात असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details