अहमदनगर- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी गेले हे सांगताना केंद्र सरकार ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, हे सांगत असताना महाराष्ट्र राज्यात ऑक्सिज अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या चांगल्या कामगिरीवर टिप्पणी केली आहे, याचाही त्यांनी दाखला दिला. देशात कोरोना हाताळताना महाराष्ट्र मॉडेल हे यशस्वी असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कोणी काहीही आरोप केले तरी त्याची चिंता नसल्याचे राऊत म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे कोरोना काळात राज्य सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नेवासे तालुक्यातील सोनई येथे महाराष्ट्र शासन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील सेना नेते उपस्थित
या कार्यक्रमास राज्याचे मंत्री जलसंधारण मंत्री आणि नेवासा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, अहमदनगरच्या महापौर रोहिणी शेंडगे आदी उपस्थित होते. दीपक फटीलाईझरच्या मदतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन कार्यक्रम शनिवारी (दि. 31 जुलै) सोनई इथे संपन्न झाला.
...तर मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री आमची चंपी करतील
कोरोनाचा उद्रेक अहमदनगर जिल्ह्यात कायम आहे. कोरोना निर्बंध न हटवलेल्या अकरा जिल्ह्यात नगर जिल्हा तिसऱ्या क्रमकांवर आहे. या परिस्थितीत सोनईमध्ये आयोजित कार्यक्रमास गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचीही या कार्यक्रमास उपस्थितीत होते. या पार्श्वभूमीवर आपल्या भाषणात खासदार संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. त्यांसह अनेकांनी मास्क लावला नव्हता. नेमकी हीच परस्थिती ओळखून स्वतः खासदार राऊत यांनी भाषणात म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहत असतील तर मुंबईत गेल्यावर आमची चंपी करतील.
हेही वाचा -नेवासा कारागृहातील 17 कैदांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल